Labels

slider

Recent

Navigation

सरीवर सर ....

सरीवर सर ....

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

संदीप खरे

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: